“नसरापूरमध्ये हिप्नॉटिझमचा धक्कादायक प्रकार; भरदिवसा महिलेला तीन लाखांचा गंडा,आरोपी सीसीटीव्हीत कैद…


                   पुरंदर रिपोर्टर Live 

नसरापूर: प्रतिनिधी 

                          नसरापूर परिसरात हिप्नॉटिझमच्या माध्यमातून एका ज्येष्ठ महिलेची भरदिवसा तब्बल तीन लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २४ जुलै) सकाळी १० वाजता घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


कमल शिवाजी रेणुसे (वय ६५, रा. नसरापूर) या महिला दररोजप्रमाणे हरदेव हॉटेलकडे जात असताना त्यांनी वाटेत श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. मंदिराबाहेर पडताच एक अनोळखी मास्कधारी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली. आपण “जैन समाजाचा असल्यामुळे मंदिरात जात नाही, पण ९०० रुपये दान करायचे आहेत" असे सांगून त्याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला.


 नंतर दुचाकीवर बसवून त्या महिलेला बनेश्वर रोडवरील काळूबाई मंदिराजवळ नेण्यात आले. तिथे कथितरीत्या हिप्नॉटिझम करत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण, तसेच हातातील सोनेरी अंगठी असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.


              घटनेनंतर राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित माने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना विशेष काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments